Shinde Vs Thackeray: 'ही'3 कारणं, म्हणून शिंदेंना 'धनुष्यबाण' गोठवायचाय...

आतापर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गट दावा सांगत होता. हे चिन्हं आपल्यालाच मिळावं यासाठी शिंदे हट हट्टाला पेटला होता.

Updated: Sep 7, 2022, 06:29 PM IST
Shinde Vs Thackeray: 'ही'3 कारणं, म्हणून शिंदेंना 'धनुष्यबाण' गोठवायचाय... title=

अनिकेत पेंडसेझी मीडिया, मुंबई: आतापर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गट दावा सांगत होता. हे चिन्हं आपल्यालाच मिळावं यासाठी शिंदे हट हट्टाला पेटला होता. निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मुभा आयोगाला द्यावी, अशी विनंतीही शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात केली होती. येनकेनप्रकारेण हे चिन्हं मिळवायचंच असा शिंदे गटाचा प्रयत्न होता. पण आता शिंदे गटानं चक्क हे निवडणूक चिन्हं गोठवण्याची मागणी केलीय. अचानक शिंदे गटानं ही मागणी का केली? धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिंदे गटाला काय मिळणार? उद्धव ठाकरेंचं कसं नुकसान होऊ शकतं? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न.

सर्वात आधी जाणून घेऊयात एकनाथ शिंदे गटाची नेमकी मागणी काय?

धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे. सुप्रीम कोर्टानं यावर काहीही निर्णय दिला नाही. पण 27 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी घ्यायचं ठरवलंय. आता शिंदे गटानं अचानक धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी का केली, हेही जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. त्याची मुख्यतः तीन कारणं आहेत.

'ही' पोटनिवडणूक ज्यावर शिंदेंचा डोळा..

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही लागू शकते. निवडणूक आयोगाकडून कधीही या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. शिवसेना या मतदारसंघातून स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना रिंगणात उतरवयाच्या तयारीत आहे. ऋतुजा लटके या धनुष्यबाण या चिन्हावर लढल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय, सहानुभूतीचा फॅक्टर आहेच. त्यामुळे  शिंदे-भाजपला आपला उमेदवार निवडून आणणं सोपं नाही. म्हणूनच या निवडणुकीआधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गट धावपळ करतोय. 

मुंबई महापालिका फॅक्टर

मुंबईसह राज्यातील मुख्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटासोबत आहेत. तरीही अजून तरी शिंदे गटाला तांत्रिकदृष्ट्या शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली नाही. अशा वेळी धनुष्यबाण हे चिन्हं अत्यंत निर्णायक भूमिका वठवू शकते. या चिन्हावर शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले तर मतदार संभ्रमात पडू शकतो. धनुष्यबाण म्हणजे शिवसेना असंच समीकरण असल्यानं मतदार शिंदे गटाच्या पारड्यात मतदान करु शकतात आणि उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच आता हे चिन्हच गोठवण्याची मागणी शिंदे गटानं केलीय. 

शिवसेनेवरचा दावा, अधिक प्रबळ होणार?

शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी जोरदार युक्तिवाद आतापर्यंतच्या सुनावणीत केले गेलेत. शिवसेनेचं अधिकृत चिन्हच जर शिंदे गटाला मिळालं तर शिवसेना पक्षावरचा शिंदे गटाचा दावा आणखी मजबूत होईल. त्याचसाठी शिवसेनाभवन, शिवसेनेच्या शाखा, दसरा मेळावा आपलाच असा दावा शिंदे गटाचे आमदार करतायत. शिवसेना पक्षावरच्या अधिकृत दाव्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या चिन्हावरचा दावा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी आग्रही आहे. हे चिन्ह आपल्याला मिळत नसेल तर ठाकरे गटालाही मिळू नये आणि त्यासाठी चिन्हं गोठवण्याची मागणीच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली. अर्थात सुप्रीम कोर्टानं या मागणीवर काहीही निकाल दिलेला नाही. 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगानं यावर कोणताही निर्णय देऊ नये असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. 27 सप्टेंबरला 10 मिनिटांसाठी सुप्रीम कोर्टात याप्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला जाणार आहे. त्यामुळे चिन्हाबाबतचा निर्णय तेव्हा होऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

inside story why shinde group wants to frees shivsenas party election symbol