मराठीच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, अजित पवार संतापलेत

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रश्नांचा भडीमार केला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2018, 01:04 PM IST
मराठीच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, अजित पवार संतापलेत title=

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रश्नांचा भडीमार केला. राज्यपालांचे अभिभाषण आणि मराठी भाषा दिन कार्यक्रमातील गलथानपणामुळे राज्याची लाज गेली असून मराठीचा जाणीवपूर्वक खेळखंडोबा करणाऱ्यांची गय करु नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

 मराठी भाषेचा आणि सुरेश भट यांचा अपमान

मराठी भाषा गौरव दिनी सुरेश भट यांचे मराठी गीत गायले गेले. हे गीत सात कडव्यांचे आहे. मात्र सरकारने आज जे गीत गाण्यासाठी छापले होते त्यातले शेवटचे कडवे गाळण्यात आले. सात कडव्यांचे गाणे असताना सहा कडवी छापली आणि गायली गेली. हा मराठी भाषेचा आणि सुरेश भट यांचा अपमान आहे, असा संताप पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीचा खेळखंडोबा

आज सकाळी मराठी भाषा कार्यक्रमात माईक बंद पडला. मराठी गौरव गीताचे शेवटचे कवडे गाळले. कोणीतरी जाणीवपूर्वक मराठीचा खेळखंडोबा करत आहे. हे मुद्दाम केले जातेय का? अशी टीका माजी  अजित पवार यांनी केली. 

राज्याची माफी मागा

दरम्यान, या गीतातून सातवे कढवे काढण्यात आल्याने विधानसभेत गोंधळ झाला. अजित पवार, विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने राज्यातील जनतेची माफी मागण्याची मागणी केली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झालेत. ते म्हणाले, हे कडवं कधी लिहलं गेलं ते शोधा. तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं, ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गोंधळ सुरु असताना अध्यक्षांनी  १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

विधानसभेत एकमताने ठराव 

मराठी भाषा जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी विधानसभेत मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस सरकारने अधिक चालना द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर झाला.