'ईव्हीएमध्ये घोळच करायचा असता तर शरद पवारांना बारामतीमध्ये हरवलं नसतं का?'

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने तीन राज्ये जाणुनबूजून गमावली.

Updated: Jun 2, 2019, 04:04 PM IST
'ईव्हीएमध्ये घोळच करायचा असता तर शरद पवारांना बारामतीमध्ये हरवलं नसतं का?' title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शरद पवार निराश झाले आहेत. त्यांना हा पराभव पचवता येत नसल्याची टीका भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी केली. शरद पवार यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटला प्रत्युत्तर देताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये जाणुनबुजून पराभव पत्कारला, असे पवारांनी म्हटले होते. 

या टीकेला प्रत्युत्तर देताना मधू चव्हाण यांनी म्हटले की, शरद पवार यांचे वय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची जागा बघून त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचे हे विधान केवळ हास्यास्पदच नाही, तर यामुळे त्यांची उरलीसुरली विश्वासर्हता संपुष्टात येऊ शकते. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तीन राज्य गमावण्याइतकी भाजपा बिनडोक आहे का? आम्हाला ईव्हीएममध्ये घोळ करायचा असता तर बारामतीमध्ये तुम्हाला हरवलं असतं, ज्या केरळमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलय तिथे आम्ही पाच-दहा जागा मिळवल्या असत्या, काश्मीर खोऱ्यातल्या लोकसभेच्या दोन-तीन जागा मिळवल्या असत्या, असे मधू चव्हाण यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कदाचित पवारांना नैराश्य आले असावे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव पचवता येत नसावा. त्यामुळे ते अशाप्रकारची हास्यास्पद विधाने करत आहेत. त्यांनी हे वक्तव्य कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी केले असेल तर ते एकवेळ क्षम्य असेल. मात्र, लोकांनी त्यांना खरंच गांभीर्याने घ्यावं, असे वाटत असेल तर त्यांनी अशी वक्तव्ये करणे थांबवायला पाहिजे, असेही मधू चव्हाण यांनी सांगितले.