'निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन करतील'

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत

Updated: Feb 26, 2021, 04:10 PM IST
'निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन करतील' title=

मुंबई : कोरोना रूग्णसंख्या सातत्यानं वाढत राहिल्यास आणि नागरिकांचा निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास, मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन आणण्याची शक्यता कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर नितीन कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. 15 ते 25 वयोगटातले तरूण कोरोनाचे गंभीर रूग्ण होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 

'पार्टी, लग्न, समारंभ हे कमी झाले पाहिजे. समारंभात जाणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचे संसर्ग होत आहे. घरी येऊन ते इतरांना पण इन्फेक्ट करतात. गावाकडे लग्न जोरात सुरु आहे. निवडणुका झाल्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. मास्क न लावता ५०० लोकं एकत्र येत आहेत. त्यामुळे कुटुंब इन्फेक्ट होत आहेत.' असं ही नितीन कर्णिक यांनी म्हटलं आहे. तरुण आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यांनी भीती देखील व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने शासनाने आता कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात रुग्ण वाढत आहेत. त्या भागात कारवाई सुरु आहे. पण अनेक ठिकाणी अजूनही लोकं नियम पाळताना दिसत नाहीयेत. मास्क शिवाय वावर, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. मुंबईसाठी ही येणारे १० दिवस महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे. जर रुग्ण संख्या वाढत राहिली तर मग सरकारला कठोर निर्णय़ घ्यावेच लागतील.

राज्यात सध्या लॉकडाऊनची गरज नाही पण कठोर निर्बंध लावावे लागतील असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुंबई लोकल बंद करण्याची गरज नाही पण त्या रिशेड्युल करावी लागेल असं त्यांनी विधान केलं आहे. बसमधील, मार्केटमधील गर्दी कमी करावी लागेल. सिनेमाघरं बंद करावी लागतील, मंगल कार्यालयांवर वॉच ठेवावा लागेल असं ते म्हणाले. तामिळनाडूने सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. असंही ते म्हणाले.