ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला तर बहुजन नेत्यांची उणीव?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिल्याने ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला आहे.  

Updated: Oct 21, 2020, 06:44 PM IST
ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला तर बहुजन नेत्यांची उणीव?  title=
संग्रहित छाया

दीपक भातुसे, मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिल्याने ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला आहे. बहुजनांना जवळ आणण्यासाठी भाजपने १९८० च्या दशकात राबवलेल्या माधव फॉर्म्युलाला आतापर्यंत असे अनेकदा तडे गेले आहेत.  

 जनसंघातून तयार झालेल्या भाजपला बहुजन, ओबीसी चेहरा देण्यासाठी पक्षाने सुरुवातीपासून प्रयत्न केले. भाजपच्या स्थापनेपासूनच म्हणजेच १९८० पासून भाजपने 'माधव' हा फॉर्म्युला राबवला.  
‘मा’ म्हणजे माळी 
‘ध’ म्हणजे धनगर आणि 
‘व’ म्हणजे वंजारी. 

तेव्हा पक्षाने वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडेंना ताकद दिली. माळी समाजातून ना. स. फरांदे यांचं नेतृत्व समोर आणलं तर धनगर समाजाचे अण्णा डांगे यांना समोर आणले. 
 
तेव्हाच्या काँग्रेस पक्षात मराठा समाजाचं वर्चस्व होतं. ओसीबीमधील बहुजनांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने हा माधव फॉर्म्युला आणला होता. तो पुढे पक्षात यशस्वीही झाला. मात्र कालांतराने ओबीसी समाजातील नेत्यांचं विविध कारणांनी भाजपमध्ये खच्चीकरण झालं. अगदी भाजपच्या उभारणीत महत्त्वाचr भूमिका बजावणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनीही पक्ष सोडण्याचा अनेकदा विचार केला होता. मात्र दुर्दैवाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि भाजपने ओबीसींचा एक मोठा नेता गमावला. 

त्यापूर्वीच माधव फॉर्म्युल्यातील धनगर समाजाचे नेते अण्णा डांगेंनीही भाजपला रामराम ठोकला होता. २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता आली, देवेेद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र या पाच वर्षांच्या सत्ताकाळात ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे नाराज होते. पंकजा मुंडेंनी कधीही उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली नसली तरी कृतीतून त्यांनी अनेकदा ते स्पष्ट केलं होते. तर खडसे यांनी सुरुवातीपासून उघडपणे नाराजी व्यक्त करणे सुरू ठेवले होते. त्याचीच परिणीती फडणवीस यांना जबाबदार धरत खडसे भाजपतून बाहेर पडले.

भाजपने सुरुवातीला जाणून बुजून राबवलेल्या 'माधव' फॉर्म्युल्याकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. एकेकाळी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे ओबीसी नेते हे भाजपचे चेहरे होते. मुंडेंचे निधन, खडसेंचे पक्ष सोडून जाणे, पंकजा मुंडेंची अलिप्तता ही सध्या भाजपमधील ओबीसी नेतृत्वाची स्थिती आहे. तर बहुजन समाजातील सुधीर मुनगुंटीवार, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, माधव भंडारी हे नेतेही काहीसे अलिप्त असलेले दिसतात. त्यामुळे भाजपला बहुजन  नेत्यांची उणीव जाणवणार का हा खरा प्रश्न आहे.