विकास भदाणे, जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो.
नागरिकही शीतपेय पिण्यासाठी रस्त्यावर लागलेल्या दुकानांवर उड्या टाकतात. मात्र हा वापरला जाणारा बर्फ नेमका किती दर्जेदार असतो, याबाबत विकणारा आणि खाणाऱ्यालाही फारसं माहित नसतं.
बाजारात उपलब्ध असणारा हा बर्फ तयार करण्यासाठी कुठे बोअरिंगचे पाणी तर कुठे अन्य स्रोतातून पाणी आणलं जातं. बोरिंगच्या पाण्यापासून तयार केलेला बर्फ खाल्ल्यास किडनी स्टोनचा धोका संभवतो. तसेच डायरियाचाही धोका असतो. गॅस्ट्रोसारखे साथीचे आजारही पसरतात. शरीरातील पचन संस्थेवरदेखील अखाद्य बर्फाचा परिणाम होतो. याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ नेमका येतो कुठून हे पाहण्याचं काम शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं आहे. मात्र तशी कृती कधी होताना दिसत नाही. त्यामुळं हा विभाग अस्तित्वात आहे कि नाही असाच प्रश्न पडतो.