राष्ट्रवादीला शिवस्वराज्य यात्रेचा कितपत फायदा मिळणार?

राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या यात्रांचा माहोल आहे.

Updated: Sep 19, 2019, 04:27 PM IST
राष्ट्रवादीला शिवस्वराज्य यात्रेचा कितपत फायदा मिळणार? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभं करण्यासाठी आणि राज्यातील तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच नेतृत्व पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांकडे देण्यापेक्षा त्याचं नेतृत्व राज्यात लोकप्रिय असलेले खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आले. या यात्रेला राज्यातील ग्रामीण भागात तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण हा प्रतिसाद मतात रुपांतरीत होणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या यात्रांचा माहोल आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, तर दुसरीकडे शिवसेनेच्या जनआशिर्वाद यात्रेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने किल्ले शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचं नेतृत्व संभाजी फेम अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आलं आहे. 

संभाजी मालिकेमुळे आणि यापूर्वी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या भूमिकांमुळे अमोल कोल्हे यांची राज्यात चांगली लोकप्रियता आहे. ही लोकप्रियता कॅश करण्याच्या दृष्टीने पक्षाने ही रणनिती आखली आहे.पक्षाच्या दिग्गज नेत्यांऐवजी अमोल कोल्हे यांच्याकडे शिवस्वराज्य यात्रेचं दिलेलं नेतृत्व राष्ट्रवादीसाठी फायदेशीर होताना दिसतंय. 

शिवस्वराज्य यात्रेला ग्रामीण भागात तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीनी राज्यातील प्रत्येकावर असल्याने शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीने यावेळी भगवे झेंडे वापरले. तर दुसरीकडे भाषणातही अमोल कोल्हे छत्रपतींच्या इतिहासाचे दाखले देऊन नवा मतदार राष्ट्रवादीबरोबर जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अमोल कोल्हे यांच्याबरोबर शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे आहेतच. यांच्या भाषणालाही उपस्थितांचा प्रतिसाद मिळतोय. मात्र या यात्रेत सहभागी असलेले अमोल मिटकरी यांच्या भाषणांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला १२५ जागा आल्या आहेत. यापैकी ८० मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद मिळत असला तरी ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नाही. अनेक जिल्ह्यातील बडे नेते पक्ष सोडून गेल्यानं तिथं पक्ष पुन्हा उभं करण्याचं आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रवादीकडे वेळही थोडाच शिल्लक आहे.