थर्टी फर्स्टला पब, बार, हॉटेल्स पहाटेपर्यंत खुले राहणार

एरवी हॉटेल्स, बार आणि पब्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असते. 

Updated: Dec 22, 2019, 03:07 PM IST
थर्टी फर्स्टला पब, बार, हॉटेल्स पहाटेपर्यंत खुले राहणार title=

मुंबई: नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत. २४, २५ आणि ३१ डिसेंबरला बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहतील, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. 

एरवी हॉटेल्स, बार आणि पब्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असते. तर वाईन शॉप्स साडेदहा वाजेपर्यंतच चालू ठेवता येतात. मात्र, नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या वेळेत वाढ करण्यात आली आहे. परंतु, वेळेच्या या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क आण‌ि पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुल्क व‌िभागाची नजर राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनासुद्धा स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारकडून बनावट मद्यापासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पार्टी करणाऱ्यांनी स्वस्त मद्य घेताना सावध राहावे. तसेच परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच उत्पादन शुल्क विभागाने साकीनाकामध्ये केलेल्या कारवाईत १३ लाख रूपयांचा बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आला होता. यावेळी अनेक विदेशी ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या आणि स्टीकर आढळून आले होते.