मुंबई : आज कांद्याला उच्चांकी भाव मिळतोय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळ कांदा १०० रुपये किलोने विकला गेला. घाऊक मार्केटमध्ये कांद्याने शंभरी गाठल्याने, किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत गेले आहेत, आज मार्केटमध्ये कांद्याच्या ११० गाड्या आल्या.
पुणे,नाशिक जिल्ह्यातील उन्हाळा कांद्याची आवक होत आहे, त्याचप्रमाणे ओतूर आणि संगमनेर येथून नवीन कांद्याची आवक होत आहे, यात नवीन कांदा हा ४० ते ६० रुपये किलो विकला गेला आहे. तर जुना कांदा ८० ते १०० रुपये किलो विकला गेला आहे. हाच कांदा किरकोळ मार्केटला १०० ते १२० रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे कांदा कमी विकला जात आहे, किरकोळ विक्रेते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून काद्यांचे दर चढेच आहेत. देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पीकाचे नुकसान झाले आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. बाजारात आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे.