मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. एक एक आमदाराला महत्व आलं आहे. त्यामुळंच गेल्या काही दिवसांपासून आमदारांचा मुक्काम मुंबईतल्या अलिशान हॉटेलमध्ये हलवण्यात आला आहे. मुंबईतल्या या हॉटेलमध्ये राहणं मध्यमवर्गीयांच्याही खिशाला परवडणारं नाही. त्यामुळं आमदारांच्या राहण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोण करत असेल असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रेनेसन्समध्ये दोन दिवस मुक्कामाला होते. रेनेसन्सच्या ६० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. एका खोलीचं भाडं १४ हजार रुपये प्रमाणं दोन दिवसांचं भाडं अंदाजे १६ लाख ८० हजार रुपयांवर गेलं. तर बॅनक्वेट हॉलचं भाडं ४ लाख रुपये आकारण्यात आलं. २५ ते २६ नोव्हेंबरपर्यंत ग्रँड हयात हॉटेलमधील २७ खोल्या बुक करण्यात आल्यात. प्रत्येक खोलीचं एका दिवसाचं भाडं १२ हजार रुपये पकडल्यास तो खर्च ६ लाख ४८ हजारांवर जातो. सोफिटेल हॉटेलच्या एका खोलीचं भाडं ११ हजार रुपये आहे. त्याच्या २० खोल्यांचं दोन दिवसांचं भाडं ४ लाख ४० हजार रुपयांवर जातंय.
शिवसेनेनं हॉटेल ललितच्या ९३ खोल्याचं १३ हजार रुपये एक रुम या प्रमाणं ३ दिवसांचं भाडं ३६ लाख २७ हजारांचं बिल होतं. तर ललितमध्येच ३ अलिशान सुट्सचे तीन दिवसांचे १ लाख ६२ हजार रुपये बिल झालं. हॉटेल लेमन ट्रीमध्ये ७० खोल्याचं ११ हजार रुपयांप्रमाणं दोन दिवसांचं भाडं १५ लाख ४० हजार रुपये होतंय. १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान हॉटेल रिट्रिटमध्ये ६ हजार रुपये खोली प्रमाणं ४० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. त्याचं भाडं ९ लाख ६० हजार रुपये झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
काँग्रेसनं जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ३ दिवसांसाठी १३ हजार रुपये प्रमाणं ५० खोल्या बुक केल्यात त्याचं बिल १९ लाख ५० हजार एवढं होतंय. GFXOUT यात काँग्रेस आमदारांच्या जयपूरवारीचा खर्चाचा अंदाजच लावता येत नाही. आम्ही जे बिल सादर केलं आहे त्यात फक्त खोलीभाड्याचा समावेश आहे. खाण्यापिण्याच्या खर्चाचा यात समावेश नाही. अलिशान हॉटेलमधील दिवसभराच्या खाण्यापिण्याचा खर्च सात ते आठ हजारांच्या घरात आहे. शिवाय सुरक्षाअधिकारी, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा खर्चाचाही यात समावेश नाही.
पंचतारांकित हॉटेलचा हा खर्च आमदारांनी स्वतःच्या खिशातून केला असेल का? दुसऱ्या कुणी केला असेल तर तो कुणी केला असेल हे कधीही कळणार नाही. ही उधळपट्टी करणारे आमदार ज्या पक्षाचे आहेत ते पक्ष याला जबाबदार असले तरी आमदारांचा बाजार मांडणारेही याला तेवढेच जबाबदार आहेत.