दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट, राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Updated: Jan 29, 2021, 08:37 PM IST
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट, राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश title=

मुंबई : दिल्लीत इस्रायलच्या दुतावासा जवळ स्फोट झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईच्या विमानतळावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वे स्थानके बस स्थानकांवर आणि महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. विविध ठिकाणी नाका बंदी ही करण्यात येणार आहे. 

दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. मात्र, हा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले गेले आहे. या स्फोटात अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या जखमीची माहिती नाही. गुप्तचर अधिकारी, विशेष सेल आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. स्फोटाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. 

जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौक येथे बीटिंग रिट्रीट चालू होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.