मुंबई : राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. (Rain In Maharashtra) अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. वसई, पालघर येथे जोरदार पाऊस झाला आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर आला आहे. तर कोकणात राजापूरमधील कोदवली, चिपळुणातील वाशिष्ठी नदी आणि खेडमधील नारंगी नदी दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, आज मुंबईत चांगला पाऊस (Rain In Mumbai) झाला तर मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली या परीसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, मुंबई-ठाण्यात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Mumbai Monsoon Alert)
कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली लावली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने कल्याण डोंबिवलीमध्ये दडी मारली होती. मात्र आज सकाळपासूनच रिमझिम पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरात सुरुवात झाली. रिमझिम पावसामुळे पुन्हा एकदा वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यात 3 दिवस मुसळधार पडेल असा इशरा हवामान विभागाने दिला असून सतर्कतेचा इशाराही दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट यांसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात काही दिवस पावसाने उसंती घेतल्यानंतर आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा हजेरी लावली. भिवंडी शहरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा जोर जर कायम राहिला तर या ठिकाणी अनेक घर व दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
वसई-विरारमध्ये दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे नालासोपारा, विरार तसेच वसई शहरातील सखल भागातले रस्ते जलमय झालेत तर अनेक रहिवासी संकुलांत पावसाचे पाणी शिरलंय. रस्त्यावर गुडघ्यापेक्षा पाणी साचलंय. पाणी ओसरे पर्यंत अशीच परिस्थिती शहरात कायम असणार आहे.
पालघर जिल्ह्यात पाऊस झाला. पालघरसह डहाणू, मनोर या परिसरात दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. अनेक भागात नदी ,नाले, ओढे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 90 मिमी.पावसाची नोंद झाली आहे.