मुंबई : मान्सून सक्रीय झाला आणि मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. (Monsoon active in Mumbai) मुंबई शहरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. (Heavy rains in Mumbai) अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी आले आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्प आहे. तर रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे. मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. पहिल्याच पावसाने नालेसफाईची पोलखोल झाली आहे.
मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. संततधार पावसाचा रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम झाला झाला आहे. एकीकडे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सायन स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचले आहे. कुर्ला स्थानकातही पाणी साचले आहे. मात्र, ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी साचलेलं नाही. परंतु ठाण्यापासून सीएसएमटीपर्यंत रेल्वे सेवा ठप्प असल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. हिंदमातामध्ये दरवर्षी प्रमाणं यंदाही पाणी साचले आहे. अनेक वेळा पाणी साचणार नाही, असा दावा केला जातो. मात्र आज पहिल्याच पावसात हिंदमाता परिसर पाण्याखाली गेला आहे. तर सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच मालाड मालवणी मढ कोळीवाडा इथे भाटी बस स्टॉप जवळ जमीन खचली आहे. त्यात बेस्टची 271 क्रमांकची बस अडकली आहे.
मुंबई पश्चिम उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झालाय. तर दुसरीकडे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मात्र प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, अंधेरी , मालाड , जोगेश्वरी भागात अधून मधून सतत पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे काही सखल भागात पाणी जमा होण्यासाठी देखील सुरू झाले आहे.