मुंबई : मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.. राज्यात आजपासून सहा दिवस मुसळधार पाऊस बरणार असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.. प्रामुख्यानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीये.. त्या अनुशंघानं प्रशासनानं नागरिकांना दक्ष रहाण्याच्या सूचना दिल्यात..
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार ८ जून रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवलीये. शनिवार दिनांक ९ जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. तर १० आणि ११ जून रोजी कोकणातील सर्वच जिह्यांत मुंबई आणि जवळच्या सर्व परिसरात अति मुसळधार पावसाच अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषतः कोकण परिसरात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिले आहेत. दरम्यान मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलंय..