'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात', गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी

Gujrat Assembly Election 2022 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणूक, मतदानासाठी महाराष्ट्रात भरपगारी रजा देण्यात आली आहे.  

Updated: Nov 23, 2022, 04:11 PM IST
'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात', गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी title=

Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुक तोंडावर आलीय. येत्या 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. तर 8 डिसेंबर 2022ला मतमोजणी (Counting) पार पडणार आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गुजरातमधल्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या (Maharashtra) काही जिल्ह्यात सुट्टी जाहीर केलीय. पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत गुजरात निवडणुकीसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला सार्वत्रिक सुटी जाहीर केलीय. विशेष म्हणजे मतदानासाठी नोकरदार वर्गाला भरपगारी रजा दिली जाणार आहे.

राज्याच्या इतिहासात पहिलांदाचा निर्णय
गुजरात निवडणुकीसाठी (Gujrat Assembly Election) महाराष्ट्रात सुट्टी दिल्याचा राज्याच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय आहे. या निर्णयवार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. हा निर्णय अनाकलनीय असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंय. आम्ही 15 वर्षात सत्तेत होतो पण आम्ही कधी अशी पगारी रजा दिली नाही, असा नवीन पायंडा पाडणं चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुकी दर पाच वर्षांनी येतात, पण याआधी महाराष्ट्रात असं कधी घडलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

गुजरातचे अनेक नागरिक महाराष्ट्रात
नोकरी-व्यवसायानिमित्ताने गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रात राहतात. यापैकी अनेक नागरिकांची नावं गुजरातच्या मतदार यादीत आहेत, अशा नागरिकांना मतदान करता यावं यासाठी गुजरात विधानसभा मतदानादिवशी सुट्टी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचं म्हटलं जातंय. हा आदेश मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही बजावण्यात आलं आहे. 

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. एकूण 182 जागांसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. भाजपने यंदा तब्बल 42 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही तिकिट दिलेलं नाही.