'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं

राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय.

Updated: Aug 11, 2017, 08:34 PM IST
'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं title=

मुंबई :  राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय. मात्र, महिला कर्मचाऱ्यांना तिच्या परवानगीने राञी साडे नऊ वाजेनंतर सकाळी सात वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी महिलांना सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

राज्यात नोंदणीकृत हॉटेल, रेस्टॉरंट्स, दुकाने आणि थिएटर्स आता आठव़ड्याचे सातही दिवस २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना विधेयकाला विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजुरी देण्यात आलीय. मात्र, विधान परिषेत या विधेयकाला गोंधळात मंजुरी देण्यात आली. नव्या सुधारणांनुसार महाराष्ट्रातल्या आस्थापनांचे दोन प्रकारात विभाजन करण्यात येईल. 

१० पेक्षा कमी कर्मचारी असणारी अस्थापने आणि १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेली अस्थापने असे हे दोन प्रकार आहेत. १० पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या अस्थापनांना स्वतःहून स्थानिक नियामकांच्या कार्यालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करून कायद्यातल्या नव्या तरतुदीचा फायदा घेता येईल. पण ज्या अस्थापनांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांचे परवान्यांची योग्य ती छाननी करून मगच त्यांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

मात्र, राञी काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या निवास स्थानापासून ने-आण करण्याची अटही घालण्यात आली आहे. माञ कोणाच्या तक्रारी आल्यास परमिट रुम, बार, स्पा, मसाज पार्लर, हॉटेल आणि दुकानांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.