Goregaon Mulund Link Road: मुंबईत लोकसंख्या वाढत चालली आहे. नागरिकांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. प्रशासनाने अलीकडेच शहरातील चौथ्या जोड रस्त्याचे काम सुरू केले आहे. सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे तीन जोड रस्ते आहेत. आता गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दोन भुयारी मार्गाच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी ते पूर्व उपनगरातील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत दोन भुयारी मार्ग बांधले जाणार आहे. या चौथ्या जोड रस्त्यामुळं पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोप्पे होणार आहे. गोरेगाव-मुलुंडमधील अंतर 20 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा सुमारे 12.20 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पामुळं गोरेगाव-मुलुंड अंतर कमी होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिमेपर्यंतच्या रस्ताचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव (पूर्व) येथील ओबेरॉय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत जोडरस्ता असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 8137 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गंत दोन बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे दोन बोगदे गोरेगाव येथील फिल्मसिटी आणि मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत दोन भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. भुयारी मार्गात तीन मार्गिका असणार आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील बोगदा संजय गांधी उद्यानाच्या खाली बांधण्यात येणार आहे. अभयारण्याच्या डोंगराखालून 20 ते 160 मीटर खोलीवरुन खणला जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4.7 किमीचा भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. हे दोन्ही भुयारी मार्गाचे बांधकाम 60 महिन्यात पूर्ण करायचे आहे. तसंच, या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकाकडून व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे.
मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते गोरेगाव हे अंतर पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सध्या या मार्गावर प्रवास करण्यासाठी एक तासांचा कालावधी लागतो. मात्र, आता प्रवासाचा निम्मा वेळ वाचणार आहे. या मार्गामुळं वाहतुक कोंडीचा प्रश्नदेखील सुटणार आहे.