'सरकार महायुतीचे येईल; ३ दिवसांत चांगली बातमी मिळेल'

सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे

Updated: Nov 4, 2019, 08:20 PM IST
'सरकार महायुतीचे येईल; ३ दिवसांत चांगली बातमी मिळेल' title=
संग्रहित फोटो

मुंबई : शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन चढाओढ सुरु आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. तर भाजपालाही मुख्यमंत्रीपद हवं आहे. राज्याच्या या सत्ता-स्थापनेच्या पेचात रावसाहेब दानवे यांनी सत्ता स्थापनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय बोलताय ते सोडून द्या, सरकार महायुतीचे येईल, आम्ही सरकार स्थापन करु, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत कुणाचेही काहीही सुरु नाही. ३ दिवसांत सर्व घडून येईल. चांगली बातमी मिळेल, आमचं म्हणजेच महायुतीचं सरकार येईल ,असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर झाला. मात्र निकालाच्या इतक्या दिवसांनंतरही अद्याप शिवसेना-भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं नाही.

राज्यातला सत्तासंघर्ष हा दिल्लीमध्ये पोहोचला आहे. सकाळी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. दुसरीकडे दिल्लीमध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या दोघांच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, हे देखील राज्याच्या राजकारणात महत्वाचे ठरणार आहे.

  

तर मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. लवकरात लवकर सरकार स्थापन करावं, शिवसेना अडथळा ठरणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे.