मुंबईकरांसाठी चांगली बातमी, बेस्ट बस पूर्ण क्षमतेने धावणार

 अनलॉक सुरु झाल्यानंतर बेस्टला ५० टक्के वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. आता बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी दिली आहे. 

Updated: Oct 23, 2020, 09:11 PM IST
मुंबईकरांसाठी चांगली बातमी, बेस्ट बस पूर्ण क्षमतेने धावणार  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव सुरु झाल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्वच सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे, बेस्ट बस, एसटी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु झाले. अनलॉक सुरु झाल्यानंतर बेस्टला ५० टक्के वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. आता बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर आता बेस्ट बस पूर्ण क्षमतेने उतरणार आहेत. बेस्ट बस पूर्ण क्षमतेने चालण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. ही परवानगी आता सरकारने दिली आहे. मात्र अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत मुंबईत ५० टक्के क्षमतेने बेस्ट उपक्रमाची वाहतूक सुरू होती. बसमध्ये प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य असेल. तसंच रोज बसेसचे निर्जंतुकीकरण करणेही अनिवार्य असेल. 

दरम्यान, मुंबईतील वाहतूक व्यवस्था चांगली आणि पूर्ववत करण्यासाठी एसटीची मदत घेण्यात आली होती. आता बेस्ट बसला पूर्ण क्षमतेने वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकलमधून अद्याप सगळ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच ५० टक्के बस वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांचे हाल तसेच नोकरी करण्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्यांचे हाल होत होते. आता हे हाल वाचणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय दिलासा देणारा आहे.