मुंबई : राज्यात कोरोना विषाणुचं संक्रमण थांबवण्यासाठी विवाह सोहळ्यांना मर्यादीत मंडळींनी उपस्थिती असावी. तसेच होणाऱ्या गर्दीला मंगल कार्यालय जबाबदार असेल असं प्रशासनानं सांगितल्याने, अनेकांनी मार्च महिन्यातील लग्न सोहळा पुढे ढकलले आहेत. मात्र असं असलं तरी ज्या भागात कोरोनाचे रूग्णच नाहीत, त्यांनी झटपट उरकवून टाकण्यावर भर दिला आहे.
एप्रिल, मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहेत. लगीनसराई या ३ महिन्यातच जोमात असते.
मात्र कोरोना व्हायरसचं संक्रमण होवू नये, फैलाव होवू नये, म्हणून अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत. यामुळे लग्नाशी संबंधित वस्तुंची खरेदी देखील टाळली आहे. यातच सोन्याचा भाव आणखी घसरतच असल्याने सोने खरेदीकडेही वधू आणि वर मंडळीने पाठ केली आहे.
राज्यात अंदाजे एप्रिल महिन्याच्या सुरूवातील संक्रमण कमी झाल्यास, योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच पुढील विवाह सोहळे होतील, नाहीतर नाईलाजास्तव हे विवाह सोहळे पुढे ढकलण्याची वेळ सर्वांवर येणार असल्याचं दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव, यामुळे अमेरिकन डॉलरचा खाली आलेला भाव यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत, पण आता लग्न सोहळ्यांवरही अंकुश आल्याने सोन्याच्या भावाची आणखी दैना होणार असल्याचं दिसून येत आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव ३९ हजार ६०० रूपये प्रति १० ग्रँमच्या खाली आला आहे. (१९ मार्च २०२०)