आजपासून दिवस मोठ्ठा होणार... उत्तरायणाला सुरूवात

शिशिर ऋतूचा प्रारंभ होणार !

 आजपासून दिवस मोठ्ठा होणार... उत्तरायणाला सुरूवात  title=

मुंबई :शुक्रवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी उत्तर रात्री  ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्याने सायन मकर राशीत प्रवेश केला. त्यामुळे आज उत्तरायणारंभ होत  आहे. आजपासून शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. काल दिनमान सर्वात लहान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची होती. तसेच आजपासून  दिनमान वाढत जाणार असल्याचे खगोल अभ्यासक , पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले .

या विषयी अधिक माहिती देतांना श्री. सोमण म्हणाले की पूर्वी आपण चैत्र- वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ- आषाढ ग्रीष्म ऋतू असे पाठ करीत होतो, तसे समजत होतो परंतू ते चुकीचे आहे. ऋतू हे चांद्र महिन्यांप्रमाणे होत नसतात. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य ज्या दिवशी सायन मीन राशीत ( १८ फेब्रुवारी ) प्रवेश करतो त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ होतो.

सायन वृषभ (२० एप्रिल ) ग्रीष्म ऋतू, सायन कर्क (२१ जून ) वर्षा ऋतू , सायन कन्या ( २३ आगस्ट ) शरद ऋतू,  सायन वृश्चिक ( २३ आक्टोबर ) हेमंत ऋतू, सायन मकर ( २१-२२ डिसेंबर ) शिशिर ऋतूचा प्रारंभ होत असतो. दर वर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिनमान व रात्रीमान समान असते.

२१ जून रोजी दिनमान मोठे ( १३ तास १४ मिनिटे ) असून त्या दिवशी रात्र सर्वात लहान ( १० तास ४६ मिनिटांची ) असते असेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.