मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह यामध्ये एन आय सी यु युनिट मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे . गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . कुठल्यातरी इन्फेक्शन मुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं होतं परंतु अद्यापही पालिका प्रशासनाला नेमकं इन्फेक्शन कशामुळे झालं याचा शोध घेता आला नाही.
त्यामुळे या रुग्णालयात नेमकं काय झालं ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असा सवाल उपस्थित होतोय . ही घटना गंभीर असून या संदर्भात संबंधित जोशी व्यक्तींविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितलं.
दरम्यान, याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात एनआयसीयूमध्ये ४ बालकांचा मृत्यू झाला आहे, दोन बालकं व्हेंटिलेटरवर आहेत, वातानुकूलित यंत्रणात शॉर्ट सर्कीट झालं, तीन दिवस याकडे कुणी लक्ष दिलं नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
२०, २१ आणि २२ डिसेंबरदरम्यान ३ बालकांचा मृत्यू झाला, मुंबई महापालिकेच्या ५० हजार ठेवी आहेत, मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा चांगली असल्याचं सांगतात, पण तिथे अशी गंभीर घटना घडते, भंडारामध्येही आगीत बालकं मेली, मुंबईतही झालं, महापालिकेने ३ दिवस लक्ष घातलं नाही, हा बालकांचा खून आहे. असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली.
दरम्यान, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित वॉर्डचे वैद्यकिय अधिकाऱ्यांना निलंबित करत असल्याची विधानसभेत घोषणा केली.