Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC Blast: मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीचे लोट दूरवर दिसून येतायत. आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 12, 2024, 11:30 AM IST
Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी title=

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एका कारखान्याला आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अभिनव शाळेजवळ ही आग लागल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीचे लोट दूरवर दिसून येतायत. आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  

यासंदर्भात महाराष्ट सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, एमआयडीतील या कंपनीला आग लागली आहे. ही आग मोठी असून अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कंपनीच्या मॅनेजरशी माझं बोलणं झालं असून आजूबाजूला असलेल्या कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यास सांगितलं आहे. यावेळी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं असल्याची माहिती आहे. याशिवाय स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम कार्यकर्ते आणि स्वयंसेवकर करत आहेत. पोलिसही घटना स्थळी दाखल आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागलेल्या इंडो अमाईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. डोंबिवली एमआयडीत अजून बऱ्याच केमिकल कंपन्या आहेत. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती असल्याचं पाहायला मिळतंय.