मुंबई : राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर ०.२ टक्क्यांनी वाढेन, असा अंदाज आरबीआयने दिला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह देशातील सात राज्यांमध्ये सुमारे ८८,००० कोटी रूपयांची शेतकरी कर्जमाफी करण्याचा सरकारांचा विचार आहे. असे झाल्यास त्याचा परिणाम म्हणून महागाई ०.२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. देशात केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांकडून कर्जमाफी जाहीर केली जाऊ शकते.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पोहोचलेल्या आणि नापीकी, रोगराईमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक आरिष्ठातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करण्याचा सरकार निर्णय घेते. रिझर्व्ह बॅंकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'मिंट स्ट्रीट मेमो'मध्ये म्हटले आहे की, केंद्र किंवा राज्य सरकारांनी कर्जमाफी केल्यास सरकारी तिजोरीवरचा भार वाढेल.