सचिन वाझेवर प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाबरिया यांचे धक्कादायक आरोप

दिलीप छाबरिया यांनी सचिन वाझेवर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Jun 1, 2021, 06:41 PM IST
सचिन वाझेवर प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाबरिया यांचे धक्कादायक आरोप title=

मुंबई : प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाबरीया यांनी झी 24 तास सोबत बोलताना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेवर गंभीर आरोप केले आहेत. 'मला कुठल्याही नोटीस आणि समन्स शिवाय अटक करण्यात आली होती. सचिन वाझेने मला चुकीच्या पद्धतीने अटक केली होती. माझ्या सोबत चुकीच्या गोष्टी घडल्या त्या इतरांसोबत होऊ नये म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

दिलीप छाबरिया यांनी पुढे म्हटलं की, 'पत्रात सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. १५ एफआयआर तुमच्यावर नोंदवू. किमान दोन वर्षे तुरुंगात राहावे लागेल असे होऊ द्यायचे नसेल तर २५ कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगून सचिन वाझे सतत पैशांची मागणी करायचा.'

'पैसे दिले नाहीत तर कुटुंबियांना ही अटक करणार असे धमकावले जायचे. सचिन वाझेला अटक झाली नसती तर त्याने मला दोन वर्षे तुरुंगात ठेवले असते.' असं देखील छाबरिया यांनी म्हटलंय.

'सचिन वाझे सांगायचा हे पैसे फक्त मला जात नाहीत तर माझे बॉस परमबीर सिंग यांना ही द्यावे लागतात. मी परमबीर सिंग यांना भेटलो नाही. पण सचिन वाझे त्यांचे नाव घ्यायचा. सचिन वाझे अँटिलिया पर्यंत पोहचला, त्या पुढे मी कोण आहे.? एका उद्योजकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकणे आणि खंडणी मागणे हे कितपत योग्य आहे?' असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.