मुंबईत वाढली कडाक्याची थंडी; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; पण नेमकं कारण काय?

पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

प्रशांत अंकुशराव | Updated: Jan 28, 2022, 05:52 PM IST
मुंबईत वाढली कडाक्याची थंडी; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; पण नेमकं कारण काय? title=

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत १३.२ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.

स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईतील पारा हा ५ अंशांनी घसरला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील कमाल तापमानातही घसरण झाली आहे. सध्या मुंबईत २६.७ कमाल तापमान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे तापमानही सर्वात कमी आहे. दरम्यान पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

थंडी वाढण्यामागचे कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून मुंबईत थंड वारे वाहत आहे. हेच वारे वाढत्या थंडीला कारणीभूत आहेत. 

त्या ठिकाणी सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. या दोन कारणांमुळेच मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. अशी माहिती स्कायमेट या हवामान संस्थेचे शास्त्रज्ञ महेश पालवत यांनी ट्वीट करत दिली आहे.

पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई आणि उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता कायम असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या हवेत वाढलेला सुखद गारव्याचा नागरिक आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या थंडीमुळे अनेक नागरिक शेकोटीचा आधार घेत आहे.

अन्य शहरातील तापमान
नागपूर २२ अंश, नाशिक २४ अंश, महाबळेश्वर २२ अंश, पुणे २६ अंश, सांगली २८ अंश, लोणावळा २५ अंश