पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

राजीव कासले | Updated: Aug 24, 2023, 06:11 PM IST
पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ title=

Mumbai News Today: मुंबई. पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. साथीच्या आजारांच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान तब्बल 11 लाख 91 हजार 720 घरांचे सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात 49 लाख 78 हजार 981 लोकांचे सर्वेक्षण केले. यात तब्बल 1 लाख 14 हजार 599 लोकांचे ब्लड सॅपल घेण्यात आलं असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत अँनोफिलीस डासांची 2,349 तर डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांची 15 हजार 231 अशी एकूण 17 हजार 580 ठिकाणी उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. 
दरम्यान, साथीच्याआजारांत गेल्या 20 दिवसांत 8 हजार 9  रुग्ण लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत. लेप्टोचे निदान झालेल्या 8 हजार 9 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 

पावसाने पाठ फिरवल्याने जून कोरडा गेला असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ऑगस्टच्या २० दिवसांत स्वाईन फ्लू - १००, मलेरिया - ७०४, लेप्टो - २१७, डेंग्यू - ४९५ गॅस्ट्रो - ६६०, कावीळ - ४८ आणि चिकनगुनीयाचे १४ रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजार वाढत असल्यामुळे पालिकेकडून प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ठेवले आहेत

मलेरिया रोखण्यासाठी झाडाझडती
मलेरिया टाळण्यासाठी अ‍ॅनोफिलीस डासाची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी १८,६२० घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५०,३२० प्रजनन स्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २,३४९ ठिकाणी मलेरिया डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत.

डेंग्यू नियंत्रणासाठी शोध मोहीम
डेंग्यूला आळा घालण्यासाठी एडीस डासाचा शोध घेण्यासाठी १० लाख ७१ हजार ५२४ घरांची तपासणी करण्यात आली. यात ११ लाख ४२ हजार ८६६ कंटेनरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १५ हजार २३१ ठिकाणी एडीस डासाची ठिकाणे आढळली

२० दिवसांत ६ हजार उंदरांचा खात्मा!
लेप्टोच्या प्रसारास उंदीर कारणीभूत ठरत असल्यामुळे खासगी संस्था आणि पालिका कर्मचार्‍यांच्या माध्यमातून मूषक नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. १ ते २० ऑगस्ट दरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत ६,१४० उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. यात विषारी गोळ्या टाकून ३,१७९ तर पिंजरे लावून २,९६१ उंदरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली

खबरदारी घ्या!
गॅस्ट्रो, कावीळ व टायफाईड या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु मुंबईकरांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे
पाणी उकळून प्यावे, पाणी जास्तीत जास्त प्यावे, रस्त्यांवरील उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा