५ रुपयांत वडापाव विकून मयूरेशच्या कुटुंबियांना मदत

 मयूरेश हा कुटुंबातील एकमेव कमावता युवक होता. मयुरेशच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय सर्वच बाजूंनी अडचणींचा सामना करीत आहेत.

Updated: Oct 14, 2017, 07:53 PM IST
५ रुपयांत वडापाव विकून मयूरेशच्या कुटुंबियांना मदत title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया मुंबई : रांगा लावण हे मुंबईकरांसाठी काही नवं नाही. मग ती बॅंकेतील असो कि रेल्वे तिकिटसाठी..पण आजच्यादिवशी मुंबईकरांनी रांगा लावल्या ते 'मुंबईकरांच स्पीरीट' दाखविण्यासाठी...मुंबईतल्या एलफिन्स्टन विभागात आज दिवसभर लांबच लांब रांग पहायला मिळत होती. ही रांग होती ५ रुपयात वडापाव घेण्यासाठी. मयत मयूरेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी..

मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशन येथे २९ सप्टेंबरला दुर्देवी घटना घडली होती. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक मुंबईकर यावेळी जखमींच्या मदतीसाठी धावले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापासून रक्त देण्यासाठी रांगा लावताना यावेळी असंख्यजण दिसून आले. यातच मयूरेश हळदणकर या वरळीत राहणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. मयूरेश हा कुटुंबातील एकमेव कमावता युवक होता. मयुरेशच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय सर्वच बाजूंनी अडचणींचा सामना करीत आहेत.
मयूरेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी मंगेश अहिवले आणि त्याच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेतला आहे.

शनिवारी मंगेश एका खास उद्देशानं वडापावचा स्टॉल लावला. नेहमी १० रुपयाने वडापाव विकणाऱ्या मंगेशने शनिवारी ५ रुपयाने वडापाव विकले. वडापावच्या स्टॉलमधून मिळणारे सगळे उत्पन्न मयुरेशच्या कुटुंबीयांना दिले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी वडापाव खावा आणि मयुरेशच्या घरच्यांना मदत व्हावी, अशी मंगेशची इच्छा आज दिवसभर मुंबईकरांनी पूर्ण केली आहे.मंगेशचा उद्देश कळल्यापासून त्याच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागली आहे. सकाळपासूनच मुंबईकरांचा राबता या स्टॉलवर पाहायला मिळत होता. शेजारी असलेल्या डोनेशन बॉक्समध्येही नागरिकांनी आर्थिक मदत देऊ केली.

एखाद्याच्या जाण्याची कमी आपण भरून काढू शकत नाही. पण आपल्या सहकार्याने त्याच्या कुटुंबियांचे दु:ख हलके होत असेल तर ती मोठी गोष्ट आहे असे मंगेश अहिवले ने 24taas.com ला सांगितले.
एलफिन्स्टन दुर्घटनेत जे गेले, त्यांची जागा भरुन काढणं शक्य नाही.पण मंगेशसारखे लोक सामाजिक भान जपत त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीचा हात देतायत यालाच मुंबईकरांचं स्पिरीट म्हणत असावेत. 

थोडसं मयूरेशबद्दल

२० वर्षाचा मयुरेश हळदणकर हा तरूण नेहमी बाईकने प्रवास करीत असे. पण पावसाची थांबण्याची चिन्हे न दिसल्याने त्याने त्यादिवशी बाईकने जाणं टाळलं. त्याला बॅंकेत चेक जमा करायचा होता, म्हणून तो लोकलने निघाला, मात्र एलफिन्स्टन ब्रिजवर त्याच्यावर काळाने घाला घातला.
शिवसम्राट मित्रमंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता, गणपती मूर्तींची आखणी, मूर्तीवर केले जाणारे डायमंड वर्क यात अत्यंत तरबेज असलेल्या मनमिळाऊ मयूरेशच्या जाण्याने बीडीडी चाळीवर शोककळा पसरली. बीडीडी चाळ-८० येथील मयुरेशवर आपल्या घराची सर्व जबाबदारी होती.