भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत

विधानसभेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता

Updated: Nov 1, 2019, 10:24 AM IST
भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत  title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर नव्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाचा हात सोडणार असल्याचं समजतंय. भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

२०१४ प्रमाणेच यावेळीही भाजपा अल्पमतातील सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपाला शिवसेनेची साथ मिळणं जरा कठिण दिसतंय. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केल्यास नवीन सभागृहात हंगामी अध्यक्ष सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर नवीन अध्यक्ष्यासाठी निवडणूक होईल.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करू शकतात. या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास त्याला शिवसेना आणि काँग्रेसचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. 

ही समीकरणं पाहता भाजपाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात त्यामुळे भाजपाला अडचणी येऊ शकतात. 

भाजपा बहुमत सिद्ध करू शकले नाही तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली होऊ शकतात. त्यामुळेच विधानसभेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता वाढलीय.