आताची मोठी बातमी! राज्यातील घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर दिल्लीत जोरदार हालचाली  

Updated: Jun 24, 2022, 03:35 PM IST
आताची मोठी बातमी! राज्यातील घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना title=

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात आता वेगवान घडामोडी सुरु आहेत. एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) समर्थक आमदार गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये थांबले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे गुवाहाटीतून निघाले आहेत. आज ते मुंबईत येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या दिशेने एकनाथ शिंदे गटाने जोरदार हालचाली सुरु केल्याचं स्पष्ट झालं आहे.

वाढता घटनात्मक पेच बघता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. गुवाहाटीतून एका विशेष चार्टर्ड प्लेनने ते गोपनिय रित्या दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत एकनाथ शिंदे गृहमंत्री आणि पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रातील परिस्थितीची सर्व माहिती देतील. तसंच एकनाथ शिंदे राष्ट्रपतींनाही भेटण्याची शक्यता आहे. 

कालच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते. त्यानंतर आज एकनाथ शिंदे तात्काळ दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. 

शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र आजच हे आमदार राज्यपालांना देतील. त्याचवेळी शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे.