एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्य न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

शिवसेनेने 16 आमदारांच्या निलंबनाबाबत केलेल्या कारवाई विरोधात एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Updated: Jun 26, 2022, 07:31 PM IST
एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्य न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता title=

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली आहे. निलंबित आमदार आणि गट नेता पदाबाबत शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली असून याबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची बैठक झाली. या बैठकीत 16 आमदार निलंबन आणि न्यायालयीन लढाईबाबत चर्चा झाली. राज्यात परत गेल्यानंतर पुढील रणनीती आणि नियोजनाबाबतही यावेळी चर्चा झाली. 

शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांविरोधात कारवाई सुरू केलीये. 16 आमदारांच्या अपात्रतेचे सर्वाधिकार विधानसभा उपाध्यक्षांना आहेत. या आमदारांना उद्यापर्यंत उत्तर द्यावं लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे गटाबरोबर दोन तृतीयांश आमदार आहेत याचा अर्थ अपात्रतेची कारवाई लागू होत नाही, असं शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलंय. बंडखोर आमदार 48 तासात आले नाहीत तर त्यांचं निलंबन होऊ शकतं असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

पुण्यात उद्धव ठाकरे समर्थकांनी मोर्चा काढला. यावेळी बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेतल्या अंतर्गत बंडाळीनंतर उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक आक्रमक झाले आहेत. कुठे बंडखोरांविरोधात मोर्चे काढले जातायेत तर कुठे बंडखोर आमदारांचेही समर्थकही शक्तिप्रदर्शन करताना दिसतायेत.