प्रफुल्ल पटेलांना ईडीचा जोरदार धक्का, संपत्तीवर टाच, सूत्रांची माहिती

राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Updated: Jul 21, 2022, 07:03 PM IST
प्रफुल्ल पटेलांना ईडीचा जोरदार धक्का, संपत्तीवर टाच, सूत्रांची माहिती title=

मुंबई : ईडीचं राज्यातील धाडसत्र कायम आहे. ईडीने (Enforcement Directorate) आता राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिलाय. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे. पटेल यांच्या इमारतीतील 2 मजले जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (ed enforcement directorate attache ncp rajya sabha mp prafull patel house in mumbai)

नक्की प्रकरण काय? 

मुंबईतील वरळी इथे प्रफुल्ल पटेल यांची सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. इमारतीच्या बांधकामाआधी त्याजागी छोटी इमारत होती. ती इमारत इक्बाल मिर्चीच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली.

या पुनर्बांधणीच्या मोबदल्यात पटेल यांनी मिर्चीला रक्कम आणि जागा दिली असल्याचं इडीने सांगितलंय. या सर्व व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणात इडीकडून सर्व तपास सुरु आहे. ईडीने पटेल यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती

प्रफुल्ल पटेल यांनी 2016 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यावेळी त्यांची मालमत्ता 252 कोटींची होती. प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत सुमारे 188 कोटींची भर पडली आहे. पटेल यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार जंगम मालमत्ता 14 कोटी 36 लाख, तर पत्नीची जंगम मालमत्ता 34 कोटी 12 लाख आणि एकत्र कुटुंबाची जंगम मालमत्ता 80 कोटी आहे. 

पटेल यांच्याकडे 1 कोटीचे, तर पत्नीकडे 6 कोटी 44 लाखांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. तर घरे, जमीन, व्यापारी जागा अशी 75 कोटींची स्थावर मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर आहे.

तर 104 कोटी 56 लाखांची मालमत्ता पटेल यांच्या पत्नीच्या आणि 107 कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावावर आहे. विशेष म्हणजे पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही. तसेच 14 कोटींचे दायित्व आहे.

कोण आहेत प्रफुल्ल पटेल? (Who Is Prafull Patel)

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. प्रफुल्ल पटेल चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. सध्या राज्यसभा सदस्य देखील आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. 

राष्ट्रवादीचा तिसरा नेता ईडीच्या रडारवर 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता हा आता ईडीच्या रडारवर आला आहे. याआधी ईडीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई केली होती.