मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. ईडीने संजय राऊत यांना आता पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावलं आहे. त्यानुसार राऊत यांना 27 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ed enforcement directorate agains summons to shiv sena leader and rajya sabha mp sanjay raut in Patra Chawl land scam)
राऊत यांना मंगळवारी 19 जुलैला ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी आज 20 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.
राऊत यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितली होती. मात्र ईडीने त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदती दिली आहे. त्यामुळे आता राऊतांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. दरम्यान याआधी 1 जुलैला ईडीने राऊतांची जवळपास 10 तास चौकशी केली होती.
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.