मुंबई : मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' (Drung and Drive) प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळेस तसंच विकेंडच्या दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावं, मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षीतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
वरळी हिट अँड रन केस
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना शिवडी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. राजेश शहा यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली. तर BMW चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीय.
काय होती घटना
वरळीच्या हिट अँड रनमध्ये नाखवा दाम्प्यत्याला उडवणारी BMW कार शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहाची आहे.. तर ही गाडी त्याचा मुलगा मिहिर शहा चालवत होता. पोलिसांनी राजेश शहाला ताब्यात घेतलं. तर त्याचा मुलगा मिहिर शहा फरार आहे. 24 तासानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय. अपघातावेळी मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत या गाडीत होता... पोलिसांनी मिहिर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केलाय.