आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न महागलं, कितीने वाढल्या घराच्या किंमती पाहा व्हिडीओ

सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न आणखी दूर, पाहा कितीने वाढल्या घराच्या किंमती 

Updated: Jan 25, 2022, 07:53 PM IST
आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न महागलं, कितीने वाढल्या घराच्या किंमती पाहा व्हिडीओ title=

देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : महागाईचा कहर वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल पाठोपाठ सगळ्याच क्षेत्रात महागाई वाढत चालली आहे. बांधकाम व्यवसायालाही महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पुन्हा धूसर झालं आहे.

महागाईचा कहर वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल पाठोपाठ सगळ्याच क्षेत्रात महागाई वाढत चालली आहे. बांधकाम व्यवसायालाही महागाईचा फटका बसतो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पुन्हा धूसर झालं आहे.

आधी पेट्रोल, डिझेल दरवाढीनं सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं. त्यात खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलांचे दरही भडकले. हे कमी झालं म्हणून की काय, आता बांधकाम व्यवसायालाही महागाईचा तडाखा बसला आहे. 

घरं तयार करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून घरांच्या किंमतीही सुमारे 30 टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं वर्तवला आहे.

क्रेडाईनं 30 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत देशव्यापी सर्व्हेक्षण केलं. 1,322 बांधकाम व्यावसायिकांचा त्यात समावेश होता. 2022 मध्ये घराच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती या सर्व्हेत समोर आली. बांधकाम साहित्य महागल्यानं ही दरवाढ अटळ असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसायात मंदीचं वातावरण आहे. कोरोना काळात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळं अनेक बांधकाम प्रकल्प ठप्प पडलेत. सरकारनं कोरोना काळात स्टॅम्प ड्युटी कमी केली होती. त्याचा फायदा काही प्रमाणात घर खरेदीदारांना झाला.

आता ती सवलत पुन्हा काही काळासाठी सुरू करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिक करतायत. महागाई कमी होईल, अशी अपेक्षा सध्या तरी पूर्ण होणं अवघड आहे. पण किमान सरकारनं काही सवलती दिल्या तर घरबांधणी क्षेत्राला पुन्हा उभारी मिळू शकते आणि सामान्य माणसांचं घर खरेदीचं स्वप्नही साकार होऊ शकतं.