डोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक

Mumbai Local : दिवा ते डोबिंवली स्थानकादरम्यान गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 27, 2023, 01:20 PM IST
डोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक title=

Crime News : दिवा ते डोंबिवली स्थानकांदरम्यान लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आपले ओळखपत्र दाखवून रेल्वे टीसी (TC) असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे दंड वसूल करणाऱ्या एका भामट्याला डोंबिवलीत रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) त्याला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान हा भामटा बनावट टीसी असल्याचे समोर आले आहे.

विजय बहादूर सिंह असे या बनावट टीसीचे नाव असून तो ऐरोली, नवी मुंबई येथील रहिवासी आहे. त्याचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील जौनपूर आहे. दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांदरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून बोगस टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याची तक्रार गुरुवारी स्थानक व्यवस्थापक कार्यालयात प्राप्त झाली. या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी विजय बहादूर सिंहला ताब्यात घेतले. मुंबईचे मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरागय्या यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर पडताळणी केली असता, विजय सिंह नावाचा टीसी नसल्याचे सांगण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून जप्त केलेले ओळखपत्रही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

लोहमार्ग पोलीस हवालदार शंकर पाटील यांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याला प्रथम ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे गुन्हा दाखल केल्यानंतर ही घटना कोपर ते डोंबिवली स्थानकादरम्यान घडल्याने या प्रकरणाचे वर्गीकरण डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आले. आरोपीला पुढील तपासासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेनंतर आरोपीला शुक्रवारी लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या बनावट टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली? त्याने इतरत्र असे गुन्हे केले आहेत का? त्याला ओळखपत्र कोठून मिळाले? या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

"24 ऑगस्ट रोजी फिर्यादी जे मुख्य तिकीट निरीक्षक हे त्यांची ड्युटी संपवून कसारा लोकलने फर्स्ट क्लासने प्रवास करत होते. त्यावेळी गाडी जेव्हा डोंबिवली स्थानकात आली तेव्हा आरोपीने फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने इतर प्रवाशांकडे तिकीटाची मागणी केली. तिकीट नसेल तर दंड वसून केला जाईल अशी बतावणी आरोपीने केली. त्यावरुन फिर्यादीला आरोपीवर संशय आला. त्यांनी आरोपीचे ओळखपत्र तपासले असता त्यांना तो बनावट टीसी असल्याचे लक्षात आले. त्यांनी यासंदर्भात रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.