Mumbai Viral Video: ठाण्याच्या पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; पोलिसांकडून दोघांना अटक

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर लोकं देखील संतापली आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या श्वानाला मारहाण केल्याचं दिसतंय. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 14, 2024, 10:38 AM IST
Mumbai Viral Video: ठाण्याच्या पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; पोलिसांकडून दोघांना अटक title=

Mumbai Viral Video: ठाण्यामध्ये एका पाळीव श्वानाला बेदम मारहाण करणयात आली आहे. मुख्य म्हणजे याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्वानांच्या एका क्लिनिकमध्ये कुत्र्याला ही मारहाण केले गेली. 'वेटिक पेट क्लिनिक' असं या प्राण्यांच्या क्लिनिकचं नाव आहे. पोलिसांनी यासंदर्भात एक्शन घेतली असून दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही या क्लिनिकमध्ये काम करत होते. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर लोकं देखील संतापली आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या श्वानाला मारहाण केल्याचं दिसतंय. या व्हिडीयोमध्ये दिसणाऱ्या दोघांना अटक केल्याची मागणी करण्यात येतेय. 

पोलीसांनी घेतली एक्शन

व्हायरल झालेल्या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतली आहे. यावेळी श्वानाला मारहाण करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली. यामध्ये मारहाण करणारी व्यक्ती आणि घटनेचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

वेटिक पेट क्लिनिकच्या प्रवक्ताचं काय म्हणणं?

या संदर्भात वेटिक पेट क्लिनिकने एका चॅनलशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, “ही अत्यंत अस्वस्थ करणारी घटना आहे. पाळीव प्राणी पालक आणि प्राणी प्रेमी म्हणून, हे धक्कादायक आहे. आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही दोघांनाही ताबडतोब कामावरून बडतर्फ केलंय. यासंदर्भात औपचारिक चौकशी सुरू केली." 

ही घटना उघडकीस येताच PAWS संघटनेने महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स, ठाणे जिल्हा दंडाधिकारी, ठाणे आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

PAWS चे संस्थापक नीलेश भानेज म्हणाले, “कुत्रा सध्या पेटाश्रमात आहे. ही घटना ७-८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या कुत्र्याच्या मालकाचं लग्न होतं. त्यामुळे त्याच्या मालकाला याबाबत काहीच माहिती नव्हती. ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा या व्हिडिओवरून त्यांना याची माहिती मिळाली. कुत्र्याची तब्येत आता उत्तम असल्याची माहिती आहे."

मुंबईतील कांदिवलीच्या The Good Doggie pet Salon चे मालक आणि हेड ग्रुमर तन्मय जुवेकर म्हणाले की, "सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सर्वांना भावनिक पातळीवर हादरवून सोडलंय. मुख्य म्हणजे पोलीस यंत्रणेने योग्य ती कारवाई केली आहे. आपल्या पाळीव प्राण्यांचं आपण अशा हातात पाहून मला वाईट वाटतं. मात्र या घटनेनंतर आपण एक गोष्ट नक्की शिकलो. ग्रूमिंग कम्युनिटीमध्ये फक्त चांगले संदर्भ असलेले कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत.  यावेळी तुम्ही कोणाला कामावर घेत आहात याची पार्श्वभूमी तपासून पाहिली पाहिजे."

पाळीव प्राण्यांच्या मालकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात तन्मय पुढे म्हणतात की, पेट क्लिनिकमध्ये पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी वेटिंग एरिया आहे, तिथे ग्रूमिंग पाहण्यासाठी स्क्रीन किंवा टीव्ही आहे का हे पाहावं. किंवा काचेचे दरवाजे-खिडकी आहेत का याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुमच्या प्राण्यांचं ग्रूमिंग कसं सुरु आहे हे तुम्हाला पाहाता येईल. सलूनमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू वाचून घ्या. याशिवाय इतर पेट पॅरेंट्सना तुम्ही याबाबत विचारणा करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी प्राण्यांना नेत आहात त्या ठिकाणाची गुणवत्ता कशी आहे ते तपासा. त्याचप्रमाणे ग्रूमरचे प्रमाणपत्र तपासा.