मुंबई: गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी जेव्हा कार्यकर्त्यांच्या कानावर पडली तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र, सीबीआयने चौकशीअंती हा अपघाती मृत्यू असल्याचा निर्वाळा दिल्यामुळे सर्वजण शांत बसले. परंतु, आता देशाबाहेरील एखादी व्यक्ती मुंडे साहेबांची हत्या झाल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या देखरेखीखाली झालीच पाहिजे, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
'झी २४ तास'शी संवाद साधताना धनंजय यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, मुंडे साहेबांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ गेला. मात्र, सय्यद शुजा या सायबर तज्ज्ञाने मुंडे साहेबांची हत्या झाल्याचा केलेला दावा खरा असेल तर ही गोष्ट खूपच धक्कादायक आणि गंभीर आहे. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होती. सय्यद शुजा याच्या दाव्यामुळे या शंकेला पुष्टीच मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी रॉ मार्फत करण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
काँग्रेसने भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याची सुपारी दिलेय- भाजप
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या सायबर तज्ज्ञाने लंडनमधील पत्रकार परिषदेत केला. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता. त्याने भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्स डिझाईन केली होती.