मुंबई: सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ती नाटकं करुन घ्यावी. पुढीलवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत, याची शाश्वती मी देतो, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ते सोमवारी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मिरज दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटके करायचीत ती करू द्या. पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील, असे आंबेडकर यांनी म्हटले.
तसेच पुढच्यावर्षी आमची सत्ता येणार आहे. तेव्हा भिडेंना आत घालू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिले. जोधा-अकबर चित्रपटाच्यावेळी सांगलीत झालेल्या आंदोलनादरम्यान भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल झाला होता. ते गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मात्र, सरकारने भीमा-कोरेगाव प्रकरणातील भिडेंवरचा गुन्हा मागे घेतला, असे जाणुनबुजून पसरवले जाते. याबद्दल आतापर्यंत तीन-चार वेळी स्पष्टीकरण देऊन झालंय. मात्र, दरवेळी माहिती अधिकारातंर्गत तीच माहिती नव्याने मागवून आरोप केले जातात, असे फडणवीस यांनी सांगितले.