मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असल्याचा एक सर्व्हे काही दिवसांपूर्वी समोर आला होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'हा सर्व्हे कोणाचा आहे, ते मला माहिती नाही. हा सर्व्हे मी बघितला नाही. कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील, तर ते चांगलंच आहे. पण आता अपेक्षा एवढीच आहे, की महाराष्ट्र सरकारने कोविडमध्ये चांगलं काम केलं पाहिजे. मुंबईकरांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. आपण सोशल मीडियावर जाऊन मुंबईची अवस्था जर बघितली, तर कोणाची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल. माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत,' असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन:श्च हरी ओम ही संकल्पना चांगलीच आहे. सगळ्या राज्यांना सुरुवात करावी लागेलच. जमिनीवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. खुल्या दिलाने पुन:श्च हरी ओम करावं लागेल, तरच उद्योग सुरू होतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
महाविकासआघाडी सरकारच्या तीन पक्षांमध्ये संवाद नाही. अधिकाऱ्यांबरोबरही संवाद नाही. अधिकाऱ्यांचा मंत्र्यांशी संवाद नाही, असा टोला फडणवीसांनी हाणला आहे.