उल्हासनगर : संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये, आता कोरोना रुग्णांची काळजी करण्याची गरज आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोविड रुग्णांच काय होणार? हा प्रश्न राऊत यांनी विचारला असता, तर मला जास्त आनंद झाला असता, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील कोरोना रुग्णांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.
सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप केला होता.
सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार तोपर्यंत पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. जेणेकरून नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका करेल. पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाला नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे.