काँग्रेस-राष्ट्रवादीत दरी वाढली? पवारांच्या प्रकृतीची दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांकडून विचारपूस नाही

 काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंधांवर परिणाम? 

Updated: Mar 30, 2021, 02:44 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीत दरी वाढली? पवारांच्या प्रकृतीची दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांकडून विचारपूस नाही title=

दीपक भातुसे, मुंबई : अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंधांवर परिणाम? झाला आहे का ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण शरद पवार यांच्या प्रकृतीची दिल्लीतील एकाही काँग्रेस नेत्याकडून विचारपूस झालेली नाही.

भाजपच्या नेत्यांची शरद पवारांशी जवळीक वाढू लागली आहे. तर काँग्रेसचे नेते पवारांपासून अंतर ठेवून आहेत असंच चित्र दिसत आहे. पवार यूपीएचे अध्यक्ष व्हावं या संजय राऊत यांच्या विधानाचाही संबंधांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.

प्रकृतीची विचापूस करण्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांना फोन केला. मात्र काँग्रेसकडून राज्यातील नेते वगळता, दिल्लीतील एकाही नेत्याकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. 

भाजपकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या दिल्लीतील नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आशिष शेलार या राज्यातील नेत्यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मात्र काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, भालचंद्र मुणगेकर या राज्यातील नेत्याकंडूनच पवारांच्या प्रकृतीची विचारपूस झाली. मात्र दिल्लीतील एकाही नेत्यांने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मात्र पवारांना याबाबत फोन केला नाही.

ज्यांचे-ज्यांचे प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन आले त्यांचे शरद पवारांनी ट्विट करून आभार मानले आहेत. या ट्विवटवरूनच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांचा पवारांना फोन आला नसल्याचं उघड झालं आहे. 

याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, राज ठाकरे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूपासून देशातील अनेक नेत्यांनी ट्विट करून शरद पवार यांना लवकर बरे व्हावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसमधील केरळचे नाराज नेते पीसी चाको यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यापाठोपाठ शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं असं विधान संजय राऊत यांनी केलं, त्यानंतर अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीची बातमी आली. यामुळे काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीविषयी नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे.