अंतिम वर्षांच्या परीक्षेचा तिढा वाढणार, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आपल्या अधिकारांची आठवण

या संदर्भात आजच आशीष शेलारांनी घेतली होती राज्यपालांची भेट 

Updated: Jun 2, 2020, 09:53 PM IST
अंतिम वर्षांच्या परीक्षेचा तिढा वाढणार, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आपल्या अधिकारांची आठवण title=
दीपक भातुसे, झी मीडिया, मराठी :  अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करत सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपल्या अधिकारांची आठवण करून देणारं मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
 
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यात भगत सिंह कोश्यारी म्हणतात, राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विषयांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मला आहेत. विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षे संदर्भातील निर्णय विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसारच घ्यायला हवा. मात्र सरकारने परीक्षा रद्द करण्याबाबत केलेली घोषणा कोणताही विचार न करता आणि कोणत्याही कायदेशीर बाबी लक्षात न घेता केली असून ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नुकसान करणारी आहे. 
 
२ जूनला राज्यपालांनी या संदर्भातच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी परीक्षा होणारी नाही अशा घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पत्राच्या उत्तराची आपण वाट पाहत आहोत. असं ही राज्यपालांना या नव्या पत्रात म्हटलंय. 
 
त्याचबरोबर परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल या विभागातील सचिवांना १० मे रोजी प्राप्त झालाय. मात्र तो अहवाल आपल्याला अद्यापही सादर करण्यात आलेला नाही. राज्यपालांची कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरशींगद्वारे जी चर्चा झाली होती त्यात कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासंदर्भातील तयारीबाबत आपली भूमिका मांडली होती. 
 
या संदर्भात कुलपतींच्या कार्यालयाने कुलगुरूंचा अहवाल आल्यानंतर आपण योग्य ते आदेश देऊ, असं राज्यपतींनी त्या बैठकीत कुलगुरूंना सांगितलं होतं. मात्र त्यापूर्वीच राज्यसरकारने घाईघाईत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून नियमांच उल्लंघन केलेलं आहे.

विद्यार्थ्यांना दिलेल्या दोन पर्यायासंदर्भात राज्यपालांनी आपली भूमिका मांडली असून परीक्षेसाठी असे दोन पर्याय देता येणार नाही असेही म्हटलंय. एकूणच आजच्या राज्यपालांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरूद्ध राज्यसरकार संघर्ष वाढणार आहे. दरम्यान अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी घेऊन भाजपचे नेते आशीष शेलार आजच राज्यपालांना भेटले होते.