चेहरे वेगळे, पण क्रुर प्रवृत्ती तीच, 24 तासात दोन घटनांनी मुंबई हादरली

Mumbai Crime News: मुंबईत गेल्या 24 तासात घडलेल्या दोन क्रुर घटनांनी मुंबई हादरली आहे. एका घटनेत प्रेयसीच्या मृतेदहाचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले. तर दुसऱ्या घटनेत महिला वसतीगृहातल्या वॉचमननेच विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली.

राजीव कासले | Updated: Jun 9, 2023, 10:27 AM IST
चेहरे वेगळे, पण क्रुर प्रवृत्ती तीच, 24 तासात दोन घटनांनी मुंबई हादरली title=

Mumbai Crime News : मुंबई... लाखो लोकांची स्वप्ननगरी... डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन लाखो लोक मुंबईत (Mumbai) येत असतात. यातून काही छोट्या-मोठ्या गुन्हेगारी घटनाही घडत असतात. पण गेल्या चोवीस तासात घडलेल्या दोन घटनांनी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अक्षरश: हादरली आहे. क्रुरतेच्या कळस गाठणाऱ्या या दोन्ही घटनेत निष्पाप महिलांचा बळी गेला. राक्षसी वृत्ती असलेल्या नराधमांनी केलेली कृत्य ऐकून अंगाचा थरकाप उडेल. मुंबईतल्या चर्चगेट (Churchgate) आणि मीरारोड (Miraroad) या ठिकाणी या दोन वेगवेगळा घटना घडल्या. दोन्ही घटनांमधील आरोपी वेगवेगळ असेल तर त्यांची नीच वृत्ती एकच आहे. 

घटना 1 - सरस्वती मर्डर केस, मीरारोड
काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयानक घटना मुंबईतल्या मीरारोड इथं घडली (Mira Road Murder Case). या घटनेत आरोपीने लिव इन मध्ये राहाणाऱ्या प्रेयसीची हत्या केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर तिच्या मृतदेहाचे त्याने बारीक-बारीक असंख्य तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि ते भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले. तिच्या शरीराचे काही तुकडे त्याने मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर केली.

मनोज साने (Manoj Sane) अशी आरोपीची ओळख पटली असून तो 56 वर्षांचा आहे. तर लिव इनमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) असं होतं, ती 32 वर्षांची होती. मीरारोडमधल्या आकाशगंगा सोसायटीतल्या एका इमारतीत हे दोघांनी भाड्याने एक घर घेतलं होतं आणि गेली तीन वर्ष ते त्या घरात राहात होते. आकाशगंगा सोसायटीत राहाणाऱ्या काही लोकांनी पोलिसांकडे सानेच्या घरातून कुजवलेला वास येत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ त्या घरात धाड टाकली. यावेळी घरात प्रचंड दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी घराची पाहणी केली असात त्यांना घरात मृतदेहाचे तुकडे आढळले. पण जेव्हा कुकरमध्ये मृतदेहाचे शिजवलेले तुकडे पाहिले तेव्हा पोलिसही हादरले. 

नराधन मनोज सानेने आधी सरस्वतीची हत्या केली त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. कोणालाही संशय नये म्हणून त्याने ते तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले. पण सर्व तुकडे त्याला एकदम फेकता आले नाहीत. त्यामुळे घरात दुर्गंधी पसरली. त्यामुळे शेजारच्यांनी तक्रार केली आणि हे प्रकरण उघडकीस आलं.

घटना 2 - सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह, चर्चगेट
मु्ंबईतला हादवरणारी दुसरी घटना चर्चगेट इथं असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात (Savitribai Phule Women's Hostel) घडली. या वसतीगृहात राहाणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्याच खोलीत आढळून आला (Churchgate Murder Case). अकोल्यात राहाणारी ही मुलगी शिक्षणानिमित्ताने मुंबईत आली होती. ही मुलगी हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर राहात होती. पण मंगळवारी संध्याकाळपासून तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता. वसतीगृहातून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता मुलीचा मृतदेह आढळला. तिच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळण्यात आला होता. 

या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वसतीगृहात तपास सुरु केला, तेव्हा वसतीगृहाचा वॉचमन ओमप्रकाश कनोजिया  फरार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ त्याचा तपास सुरु केला.  मात्र, घटनेच्याच संध्याकाळी रेल्वे रुळावर संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.