डॉ. जलील पारकर यांनी अशी केली कोरोनावर मात

कोरोनामुळे माझं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं

Updated: Jun 23, 2020, 02:35 PM IST
डॉ. जलील पारकर यांनी अशी केली कोरोनावर मात  title=

मुंबई : जवळपास २०० कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केलेल्या डॉ. जलील पारकर यांच्या शरीरात जेव्हा कोरोना शिरकाव करतो. तेव्हा त्यांना नेमकं वाटतं ते त्यांच्याच शब्दात... 'कोरोनाने मला पूर्ण बदलून टाकलंय... मी मृत्यूला अगदी जवळून पाहिलंय.... खरंतर मृत्यूला स्पर्श केलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही...' हे सांगतायत डॉ. जलील पारकर. ज्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

डॉ.जलील पारकर यांना आपण दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर म्हणून आपण ओळखतो. डॉ. पारकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. अतिदक्षता विभागात पाच दिवस राहून त्यानंतर योग्य ते उपचार घेवून गुरूवारीच ते आपल्या घरी परतले आहेत. 

६२ वर्षीय डॉ. पारकर सांगतात की, मी कोरोनाकडे एक डॉक्टर, रूग्ण आणि कोरोनाबाधित पत्नीचा नवरा म्हणून पाहिलं आहे. मधुमेह आणि कोरोना ही सगळ्यात धोकादायक गोष्ट समजली जाते. हेच रिस्क फॅक्टर डॉ. पारकर यांच्याबाबतीत होतं. पारकरांची पत्नी देखील वांद्रे येथील लिलावती रूग्णालयात त्यांच्या शेजारील आयसीयु बेडवर कोरोनावर उपचार घेत होत्या.

८ जून रोजी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. या दरम्यान त्यांना कुठेही ताप नव्हता, श्वसनाला त्रास होत नव्हता. फक्त त्यांना अस्वस्थता जाणवत होती, असं डॉ. पारकर सांगतात. पण भूक, पदार्थाची चव आणि पदार्थाचा वास यावर मात्र मोठ्या प्रमाणात फरक जाणवला. तेव्हा डॉक्टरांनी २०० रूग्णांनी जी औषध लिहून दिली ती घेण्याचा निर्णय घेतला. 

पण यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. त्यांचे सहकारी आणि लिलावती रूग्णालयाने तात्काळ ऍम्ब्युलन्स पाठवून त्यांना रूग्णालयात दाखल करून घेतलं. सीटी स्कॅन करून आयसीयुत डॉ. पारकर दाखल झाले. 

सगळ्यात चिंतेची बाब अशी होती की,डॉक्टरांच्या ५७ वर्षीय पत्नी याना देखील श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्या देखील डॉक्टरांच्या शेजारील आयसीयु बेडवर दाखल करण्यात आलं. माझ्या पत्नीला त्या अवस्थेत बघून मला प्रचंड भीती वाटली. मी माझ्या मुलाला काय सांगू? या प्रश्नाने ते ग्रासले होते. लॉकडाऊनच्या या काळात आम्ही आमच्या मुलाला देखील भेटलो नव्हतो. फोन आणि व्हि़डिओ कॉलच्या माध्यमातून फक्त त्याला पाहिलं होतं. 

कोरोनामुळे माझं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं. आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामाकडे आपण दुर्लक्ष करतो, असं डॉ. जलील पारकर सांगतात. ते म्हणतात, 'रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतायत. पीपीईमध्ये सहा तास अन्न-पाण्याशिवाय राहात आहेत. आपलं सर्वस्व पणाला लावून लोकांसाठी लढत आहेत." याकडे आपण दुर्लक्ष करायला नको. 

१८ जून रोजी डॉ. पारकर कोरोनामुक्त होऊन घरी आले. डॉक्टरांची तब्बेत सुधारत आहे पण या काळातही त्यांनी आपली रूग्णसेवा थांबवलेली नाही. कोरोनामुळे प्रचंड थकवा आलाय पण ते रूग्णांशी फोनवरून संपर्कात आहेत. लवकरच बरा होईन आणि पुन्हा जोमाने कोव्हिड वॉर्डमध्ये परतेन... माझी खरी गरज तिथेच आहे, असं डॉक्टर पारकर सांगतात.