दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : राज्यावर देखील आता कोरोनाचं सावट पसरलं आहे. आतापर्यंत ३७ कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सापडले आहेत. राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे. शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गरज नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय. पण या सगळ्यामुळे एक नकारात्मक सूर बाहेर येताना दिसतो. एवढे दिवस घरी कसं राहणार? पण या सगळ्याची एक दुसरी बाजूही आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
रोजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे आपण प्रत्येकजणच घड्याळ्याच्या काट्यावर धावत असतो. त्यातच आलेल्या या अडचणीच्या प्रसंगाकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहायला काहीच हरकत नाही. अनेकदा आपण कामात इतके व्यग्र असतो की, घरी फक्त झोपण्यासाठीच येतो की काय अशी भावना मनात निर्माण होते. हीच भावना पुसून टाकण्याची ही उत्तम संधी आहे. दोन्ही पालक नोकरदार असल्यामुळे अनेकदा ते मुलांना पाळणाघरात ठेवतात. पाळणाघर, शाळा, शिकवणी या सगळ्यात ही मुलंदेखील घरापासून थोडी लांबच असतात. अशावेळी त्यांना घराची ऊब मिळण्याची ही उत्तम संधी आहे.
सुट्टी म्हटलं की, आपण बाहेर फिरायला जाणं पसंत करतो. मुंबईतील अनेक मॉल्स सुट्यांच्या दिवसांत तुडूंब भरलेले असतात. पण आता मॉल्स आणि गर्दीची ठिकाणं बंद केल्यामुळे तो पर्यायही बंद झाला आहे. असं असताना घरी एकत्र बसून गप्पा मारणं, सुसंवाद साधणं, घरचं गरमागरम जेवण जेवणं हे काही उत्तम पर्याय आहेत.
घर म्हणजे प्रत्येकाच्या हक्काची जागा. जिथे अमुक एक व्यक्तीला आनंद व्यक्त करता येऊ शकतो. त्याच्या मनातील प्रत्येक भावना त्या चार भिंती अनुभवत असतात. हे घर काही तिर्थक्षेत्रापेक्षा काही कमी नाही. अशावेळी कोरोनाही उत्तम संधी पाहून तुम्ही तो वेळ सद्कारणी लावू शकता.
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. 'जागतिक साथीचा रोग' म्हणून कोरोनाला घोषित केलं आहे. या आजाराशी लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती अत्यंत महत्वाची आहे. ही प्रतिकारशक्ती संतुलित राखण्यासाठी तुम्हाला तुमची मनस्थिती सांभाळण देखील तेवढंच गरजेचं आहे. अशावेळी घराबाहेर पडून भीती मनात निर्माण करण्यापेक्षा एकमेकांसोबत राहा, ही भावनाच खूप सुखकारक आहे.
या दिवसांत शरिरातील ऊर्जा साठवून घरातील अन्न खावून आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो. तसेच एकत्र असल्यामुळे घरात एक सकारात्मक विचारांची देवणघेवाण होते. 'आयसोलेशन' विभागात राहण्यापेक्षा आपल्या जवळच्या कुटुंबीयांसोबत राहून वेळ घालवणं हे कधीही आनंदाचंच असणार आहे.