लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा

एक नवं संकट उभं राहण्याची डॉक्टरांना भीती  

Updated: Mar 30, 2020, 02:25 PM IST
लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा title=
संग्रहित छायाचित्र

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचे काही दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मुंबईतील अनेक औषध दुकानांमध्ये अत्यावश्यक औषधांचा पुरवठाच बंद झाल्याची बाब आता समोर आली आहे. यात डायबेटीस (मधुमेह), ब्लड प्रेशर (रक्तदाब) यांसारख्या आजारांवरील औषधांबरोबरच इतर औषधांचा आणि रुग्णालयाला लागणाऱ्या साहित्याचाही समावेश आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या बहुतांश औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये महत्त्वाच्या आजारांवरील अनेक औषधं संपली आहेत किंवा त्याचा फार कमी साठा शिल्लक आहे. मुळात औषध पुरवठा करणारी एक साखळी आहे, यामध्ये औषध उत्पादक कंपनी, मार्केटिंग कंपनी, कॅरिंग अॅण्ड फॉरवर्डिंग कंपनी, वितरक त्यानंतर औषध विक्रेते आणि रुग्णालयं अशी ही साखळी आहे.

औषधांचा पुरवठा करणाऱ्या या साखळीत काम  करणारे कर्मचारी दूरून  कामावर येतात. रेल्वे आणि बस सेवा बंद असल्या कारणाने ते कामावर पोहचूच शकत नाहीत. त्यामुळे ही साखळीच आता कोलमडली आहे. परिणामी औषध दुकानांमध्ये अत्यावश्यक औषधांचा तुटवटा जाणवू लागला आहेत. यात डायबेटीसवरील गोळ्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या, क्रोसिन, सिनारेस्ट अशा विविध औषधांचा समावेश आहे.

औषधांव्यतिरिक्त सॅनिटरी पॅड, डेटॉल लिक्विड, साबणाचाही तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल प्रोटेक्शन किटही उपलब्ध होत नाही आहेत. याशिवाय हॅण्डवॉश, हॅण्ड सॅनिटायझऱ, एन  95 मास्कचाही तुटवडा जाणवत आहे. 

 

एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे अत्यावश्यक औषधांचा तुटवडा अशी दुहीरी चिंता औषध विक्रेते आणि रुग्णालयांसमोर उभी राहिली आहे. सध्या उपलब्ध असलेला साठा संपण्याच्या आत औषधांचा पुरवठा झाला नाही तर उर्वरित महत्त्वाच्या औषधांचाही तुटवडा भासणार आहे. त्यानंतर मात्र गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.