कोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल

कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीचा अनुभव वाचून.... 

Updated: Apr 8, 2020, 08:51 AM IST
कोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने आता लॉकडाऊनपासूनचे इतरही सर्व नियम अधिक काटेकोरपणे बजावण्यास सुरुवात केली आहे. सर्वतोपरी कोरोनापासून नागरिकांना दूर कसं ठेवता येईल याचेच प्रयत्न सुरु आहेत. किंबहुना नागरिकही आपल्या परिने कोरोनाशी झुंज देत आहेत. पण, यामध्ये माणुसकी मात्र कुठेतरी हरवत चालली आहे. 

कोरोना व्हायरसची लागण वाढत असल्याच्या घटनांची संख्या वाढत असतानाच आता माणुसकीलाही लयास जाण्याची लागण लागली की काय, असा प्रश्न कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांच्या मनात घर करत आहे. 

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार दक्षिण मुंबईतील एका ३४  वर्षीय कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाचा अनुभव हेच सांगतो. घरी राहा, सुरक्षित राहा पण, माणुसकी सोडून वागू नका असं वारंवार सांगूनही समाजामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांना, संशयितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हीन वागणूक देण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर त्यांना धमकावण्याचेही प्रकार समोर येत आहेत. 

मुंबईतील या कोरोनातून सावरलेल्या रुग्णाच्या ६४  वर्षीय वडिलांना ते राहत असणाऱ्या सदनिकेतील रहिवाशांनी सतावण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या मुलाला मागील महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यापासून त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

'माझ्या वडिलांना शेजाऱ्यांनी या काळात आधार देणं अपेक्षित होतं. किंबहुना त्यांनी तसं काहीच केलं नसतं तरीही सोईचं होतं. पण, आजचं हेच वास्तव आहे. त्यांनी माझ्या वडिलांना थेट तुरुंगाची वाट दाखवण्याचीही धमकी दिली', असं ते म्हणाले. 

युकेहून परतल्यानंतर २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंतचा काळ या व्यक्तीने कस्तुरबा रुग्णालयात काढला. जिथे सुरुवातीला पॉझिटीव्ह आलेला त्यांचा कोरोनाचा अहवाल शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये निगेटीव्ह आला. ज्यानंतर पुढे १७ एप्रिलपर्यंत ते होम क्वारंटाईनच होते. हा एक किरकोळ ताप होता, पण त्याच कोरोनाची काही लक्षणं होती अशी माहिती त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना दिली. ही एकंदर परिस्थिती असताना त्यादरम्यान गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाशी ओळख असणाऱ्यांचं त्यांच्याप्रतीचं वागणं मात्र लक्षणीयरित्या बदललं होतं. 

त्यांच्याहून वयाने फक्त तीन वर्षेच मोठ्या असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या वडिलांना धमकावलं. किमान तब्येतीची विचारपूस तर दूर त्या साऱ्यांनीच तुमचा मुलमगा कुठे गेला होता, कधी परत आला, त्याच्या चाचणीचा अहवाल आला का, आपण इमारतीचं निर्जंतुकीकरण करायचं का अशा प्रश्नांचा भडीमार वडिलांवर सुरु केला. 

मुळात कोरोनाविषयी असणारी भीती मान्य आहे. पण, किमान माणुसकीला विसरून अशी कृत्य ही मन हेलावरणारी आहेत;  अशा शब्दांत या व्यक्तीने खेद व्यक्त केला. 

 

महानगरपालिकेवरही नाराजी 

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनचा अहवाल सादर करणअयात आला. जिथे त्यांचं नाव उघड केलं जाणं अपेक्षित नव्हतं. त्याचविषयी या व्यक्तीने नाराजीचा सूर आळवला. 'मला शेकड्याने फोन येण्यास सुरुवात झाली की मी कोरोनाग्रस्त आहे की नाही. ही अतिशय खासगी बाब आहे. महानगरपालिका नागरिकांचा बचाव करु इच्छिते इथवर ठीक आहे. पण, माझ्याविषयीची किंवा इतर रुग्णांविषयीची गोपनियता पाळली जाणंही तितकंच महत्त्वाचं होतं. इथे मात्र मला माझ्यात प्रशासनाकडून विश्वासघात केल्यासारखं वाटत आहे', असं ते म्हणाले. 

हे झालं अवघं एक उदाहरण. मुळात कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या झपाट्यानं वाढत आहे त्याच वेगानं तो नियंत्रणात आणणंही शक्य आहे. घरात राहून लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद दिल्यास प्रशासनही रुग्णालयांमधील रुग्णांवर लक्ष केंद्रीत करुन आरोग्य यंत्रणेवर याचा ताण येणार नाही. मुळात इथे फक्त प्रशासनानेच नव्हे तर व्यक्ती म्हणून प्रत्येकाने आणि समाज, माणुसकीचे उपासक म्हणून एकजुटीने कोरोनाशी झुंज देणं अतिशय महत्त्वाचं आहे.