मुंबई : नवीन कोरोना रुग्ण वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र हा जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात ब्राझील आणि अमेरिका भारताच्या पुढे आहेत. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण वाढली होती. तर 34,256 जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात 297 जणांचा मृत्यू झाला होता. 4 एप्रिल रोजी राज्यात 57,074 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात आतापर्यंत 31.13 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. 25.83 लाख लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत आणि 56,330 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 लाख 72 हजार 283 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर आहे.
ब्राझील - 82,869
अमेरिका - 62,283
महाराष्ट्र - 55,469
मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात 30 एप्रिलपर्यत आवश्यक दुकानं सोडून सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, उद्याने आणि मैदान बंद करण्यात आली आहेत. दिवसा संचारबंदी तर रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
संबंधित बातमी : Curfew : रात्री 8 नंतर बाहेर पडायचे असेल तर या गोष्टी जवळ असणं आवश्यक
ऑक्टोबरनंतर मुंबईत सर्वाधिक मृत्यू
मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 10,030 नवीन रुग्ण आढळले होते तर 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरनंतर मुंबईत एकाच दिवसात झालेल्या मृत्यूची ही संख्या सर्वाधिक आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार शहरात आतापर्यंत 4 लाख 72 हजार 332 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 3 लाख 82 हजार रुग्ण बरे झाले आहेत. 11,828 लोकांचा बळी गेला आहे, तर 77,495 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.