corona Update : राज्यातील जवळपास दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, वाचा नेत्यांची यादी

राज्यातील अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात

Updated: Jan 4, 2022, 03:39 PM IST
corona Update : राज्यातील जवळपास दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, वाचा नेत्यांची यादी title=

मुंबई : राज्यात ओमायक्रॉन (Omicron) हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात बारा हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. एकट्या मुंबईत काल ८ हजार ८२ रुग्ण आढळले. 

कोरोनाने राज्यातील राजकीय नेत्यांनाही सोडलेलं नाही. गेल्या काही दिवसात राज्यातील तब्बल दोन डझन नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या चोवीस तासात शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांचा समावेश आहे. 

राज्यातील या मंत्र्यांना कोरोनाची लागण
याआधी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री केसी पडवी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

हे आमदार कोरोनाच्या विळख्यात
तर राज्यातील अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आमदार रोहित पवार,  भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, आमदार शेखर निकम, आमदार निलय नाईक, पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक, पुण्यातील पार्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मदन येरावर, यांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

विशेष म्हणजे यातील अनेक आमदारांनी नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती.

या खासदारांना कोरोनाची लागण
तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार सुजय विखे-पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण
भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. १ जानेवारीला त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटलंय, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता, यावर्षी पुन्हा कोरोना झाला असून ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. 

लग्नसोहळा भोवला
भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

तर शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष वरुण सरदेसाई यांची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.